Wednesday 8 November 2017

तुझ्यासाठी सखे

तुझ्यासाठी सखे



तुझ्यासाठी आज फक्त 
पावसाचा शृंगार केलाय.......
इवल्याशा थेंबांचा 
कंबरपट्टा विणलाय ...
टपोऱ्या थेंबांचे 
डूल घातलेत कानात....


मोठ्ठ्या सरीची 
मोहनमाळ घातलीये गळ्यात ....
लवलवणाऱ्या हिरवाईची 
काकणं भरलीत हातात ...
टपटपणारया पागोळ्यांचा 
नाद गुंफलाय घुंगरात....
चमचमणाऱ्या बिजलीची 
चंद्रकोर रेखलीय कपाळावर .....
आणि सावळया मेघांची 
काजळरेषा पापणीवर .....
सप्तरंगी इंद्रधनू 
ल्यायलेय अंगभर ,
वाऱ्याचा सळसळाट 
घुमतोय पदरावर ......


तुला आवडतं ना म्हणून
मातीच्या सुगंधाचं 
अत्तरही माखलंय ...
अन गोजिरवाणं श्रावणफूल 
केसात माळलंय ...............
बघ तरी सखे ,
तुझ्यासाठी 
आज 
नखशिखांत 
पाऊस 
बनून 
आलेय............

वेडी ही बहीणीची माया

वेडी ही बहीणीची माया



माणसांच्या गर्दीत 
हरवून बसला माझा भाऊ 
सांगा ना त्याला 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ......

एकुलता एक दादा 
त्याला जिवापाड जपला 
लग्न झाल्या पासून 
वाहिनी च्या पदरा आड लपला 
एक दिवस तरी नको वाहिनी ला भिऊ 
सांग ना रे 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ......



नको दादा साडी मला 
नको पैसा पाणी 
तुझ्या सूखा साठीच 
देवा ला करते विनवणी 
सांग तुला कोणत्या रंगाचा  शर्ट घेऊ 
सांग ना तुला 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. .... 

काम गेलं तुझ्या दाजीचं
म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते 
तळ हातावरले फोड बघून 
तूझी आठवण येते 
दादा चढउतार होतात जीवनात 
तू घाबरुन नको जाऊ 
सांग ना तुला 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ...

उचलत नाहीस फोन म्हणून 
वहीनीला केला 
Wrong नम्बर करत 
कट त्यांनी केला 
नसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ 
दादा सांग ना रे 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ...


आई बाबा सोडून गेले 
घर पोरकं झालं
आठवणींचे आभाळ 
डोळ्यामधी आले 
वाईट वाटते शेजारी येतात  जेव्हा त्यांचे भाऊ 
सांग ना तुला 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ....

नको मला जमीन 
नको घराची वाटणी 
आवडीने खाईन 
भाकरी आणि चटणी 
काकूळती ला आला जीव 
मनात राग नको ठेऊ 
दादा सांग ना रे 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ .....

बहिण

बहिण

।। मायेचं साजुक तुप
            आईचं दुसरं रूप।।

       ।।  काळजी रूपी धाक
           प्रेमळ तिची हाक।।

        ।। कधी बचावाची ढाल
      कधी मायेची उबदार शाल।।

      ।। ममतेचं रान ओलांचिंब
   पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।



     ।। दुःखाच्या डोहावरील 
           आधाराचा सेतू।।

        ।। निरपेक्ष प्रेमामागे 
           ना कुठला हेतू।।

        ।।कधी मन धरणारी ,
     तर कधी कान धरणारी.।।

    ।।कधी हक्काने रागवणारी,
 तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।

        ।।बहिणीचा रुसवा जणु,
          खेळ उन-सावलीचा.।।

       ।।भरलेले डोळे पुसाया
      आधार माय- माऊलीचा.।।

    ।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी 
          या नात्यात ओढ आहे.।। 



       ।।म्हणूनच बहिणीचं हे नातं 
             चिरंतन गोड आहे.।।

    ।।भरलेलं आभाळ रितं कराया
         तिचीच ओंजळ पुढे येई .।।

      ।।जागा जननीची भरुन  
    काढण्या निर्मीली आईनंतर ताई.।।


झोपलेल्या राशी

झोपलेल्या राशी



तारवटल्या डोळ्यांनी, 
बदलत रहातो कुशी 
अंथरुण भर लोळत लोळत, 
झोपते मेष राशी  ।।

कधी इथे झोप कधी तिथे, 
सवय त्याची अशी, 
खुट्ट होता ताडकन् 
उठते वृषभ राशी   ।।

जाडजुड गादी हवी 
पलंगपोस मऊ ऊशी, 
राजेशाही थाट, 
पाय चेपून घेते, मिथुन राशी  ।।



दंगा गोंगाट असो किती 
झोप यांना येते कशी, 
शांत गाढ माळरानीही 
घोरते निवांत कर्क राशी  ।।

आपलेच अंथरुण पांघरुण 
आपलीच तीच ऊशी, 
सावधान पोज घेऊनच 
निद्रा घेते सिंह राशी  ।।

दारे खिडक्या बंद करुन 
पुन्हा पुन्हा तपाशी, 
अर्धे नेत्र उघडे ठेऊन, 
झोपते कन्या राशी   ।।

दमसा भागता जीव म्हणे 
कधी एकदा आडवा होशी, 
ब्रह्मानंदी टाळी लागून, 
झोपी जाते तुळ राशी  ।।

एक मच्छर भुणभूण कानी 
कपाळावर बसली माशी, 
माझ्या नशीबी झोप नाही, 
म्हणते नेहमी वृश्चिक राशी  ।।



ऑफिसात डुलकी खुशाल घेशी, 
रित अशी ही उनाडटप्पू 
झोपली बघा धनू राशी  ।।

सगळं कसं वेळेवर 
जांभयी दहाच्या  ठोक्याशी, 
गजर नाही भोंगा नाही 
उठते वेळेत मकर राशी  ।।

शिस्तीत आपण रहायचं 
तक्रार नाही कशाची, 
जिथे जसे जमेल तशी, 
निद्रीस्त होई कुंभ राशी  ।।

हातपाय घुऊन येऊन 
प्रार्थना करून देवापाशी, 
दिनकर्माचा आढावा घेते 
सात्विकतेने मीन राशी   ।।

आई मी येऊ का?

आई मी येऊ का?



आई मी येऊ का?
का रे राजा?

डॉलरचा रेट कमी झाला
जा आपल्या घरी ट्रम्प म्हणाला

राजा इथली धूळ सोसेल का ?
इथली बेशिस्त पचेल का?
आम्हाला हिणवण्यात 
दिवस जातोय तुझा
परत साऱ्यांना 
आपलं म्हणशील का?



आई इथे आता 
नाही कुणी कुणाचे
सगळंच वातावरण 
झालंय खूपच संशयाचे
माहीत नाही माझी 
नोकरी कधी जाईल
भीती आता वाटते 
धोब्याचा कुत्रा होईल



एखादी छान नोकरी 
तिथे मिळेल ना गं मला
इथल्यासारखं नाही मिळालं 
तरी चालेल आता मला

ये बाळा ये 
तुला सामावून नक्की घेणार
परका झाला होतास 
पोरका नाही करणार।  

अरे राजा ये ना

अरे राजा ये ना

 

अरे राजा ये ना
नको ग आई

नोकरी मला लागू दे
डॅालर जरा कमवू दे
कर्ज माझे फिटू दे
मग मी येईन

अरे राजा ये ना
नको ग आई



गर्दी किती तिथे
राहू मी कुठे?
घर मला घेऊ दे
मग मी येईन

अरे राजा ये ना
नको ग आई

रस्ते तिथे छोटे
त्यात खड्डे मोठे मोठे 
शिस्त नाही कुठे 
हॅार्नच्या आवाजाने कानच फाटे

नाही गुणांची कदर
नाही बुध्दीचाआदर
भ्रष्टाचाराचा कहर
कसा जमायचा वावर ?

स्वच्छतेचा अभाव
सत्ता संपत्तीचा प्रभाव
आरक्षणाचा दबाव
कसा लागेल माझा निभाव?

तुला सांगतो एक खरे
वाटते इथेच आता बरे
आई बाबा तुम्हीच  
इथे येता का सारे?

आई तू ये ना
नको रे राजा

आई तू ये ना
नको रे राजा



तू म्हणतोस ते खरे
इथे नाही आता बरे
पण कारण याला
आम्हीच तर सारे

कुणी राहिले गप्प
आळी मिळी चुप्प
देश सोडून कुणी
निघून गेले हुप्प

नाही पुढाऱ्यांना टोकले
ना भ्रष्टाचाराला रोकले
ना न्यायासाठी झटले
नाही एकतेला जपले

नाही शिस्तीचे पालन
ना संस्कृतीचे जतन
नाही निसर्गाचे संवर्धन 
शिक्षणाचे निमूट, पाहिले पतन.

ना सत्याचा आग्रह
ना कर्तव्याचा निग्रह 
ना मूल्यांचा संग्रह 
केला धर्माचा दुराग्रह

आता मात्र  वाटते
सुधारायचे हे चित्र 
देशाला बदलायचे
येऊन साऱ्यांनी एकत्र

मिळून आम्ही सारे
आणू बदलाचे वारे.
मग तरी तुम्ही सारे
परतून याल का रे?

Diwali

Diwali 


बोलता बोलता सहज मी 
दिवाळीचा विषय काढला 
एकदम माझ्या मित्राचा 
चेहरा पांढरा पडला 
तो म्हणाला दिवाळी आली की 
हल्ली धड धड होतं 
जुनं सारं वैभव आठवून 
रडकुंडीला येतं 
चार दिवसाच्या सुट्टीत आता 
कसं होईल माझं 
एवढ्या मोठ्या वेळेचं 
उचलेल का ओझं ? 
 
;
 
 मी म्हटलं अरे वेड्या 
असं काय म्हणतोस 
सलग सुट्टी मिळून सुद्धा 
का बरं कण्हतोस  ?
काय सांगू मित्रा आम्ही 
चौघ बहीण भाऊ 
कुणीच कुणाला बोलत नाही 
मी कुठे जाऊ ?
आता कुणी कुणाकडे 
जात येत नाही 
आम्हालाही दोन दिवस  
कुणीच बोलावीत नाही 
चार दिवस कसे जातील
मलाच प्रश्न पडतो 
लहानपणीचे फोटो पाहून 
मी एकटाच रडतो 
पूर्वीच्या काळी  नातेवाईक 
बरेच गरीब होते 
तरीही ते एकमेकाकडे 
जात येत होते 
कुणाकडे गेल्या नंतर 
आतून स्वागत व्हायचं 
सारं काम साऱ्यानी 
मिळून मिसळून करायचं 
सुबत्ता फार नव्हती 
पण वृत्ती चांगली होती 
गरिबी असून सुद्धा 
खूप मजा होती 
मुरमुऱ्याच्या चिवड्या मधे
एखादाच शेंगदाणा भेटायचा 
त्याप्रसंगी आनंद मात्र 
आभाळा एवढा असायचा 
लाल,हिरव्या रंगाचे 
वासाचे तेल असायचे 
अर्ध्या वाटी खोबर्याच्या तेलात 
बुडाला जाऊन बसायचे 
उत्साह आणि आनंद मात्र 
काठोकाठ असायचा 
सख्खे असो चुलत असो 
वाडा गच्च दिसायचा 
चपला नव्हत्या बूट नव्हते 
नव्हते कपडे धड 
तरीही जगण्याची 
मोठी  धडपड 
सारे झालेत श्रीमंत 
पण वाडे गेले पडून 
नाते गोते प्रेम माया 
विमानात गेले उडून 
घरा घरात दिसतो आता 
सुबत्तेचा पूर 
तरी आहे मना मनात 
चुली सारखा धूर 
पाहुण्यांचे येणे जाणे 
आता संपून गेले 
दसरा आणि दिवाळीतले
आनंदी क्षण  गेले 
श्राद्ध , पक्ष व्हावेत तसे 
मोठे  सण असतात 
फ्लॅट आणि बंगल्या मधे 
दोन चार माणसं दिसतात 
 
 
;
 
प्रवासाची सुटकेस आता 
अडगळीला पडली 
त्या दिवशी माझ्याजवळ 
धाय मोकलून रडली 
हँडल तुटलं होतं तरी 
सुतळी बांधली होती 
लहानपणी तुमची मला 
खूप सोबत होती 
 सुटकेस म्हणली सर मला 
पाहुण्याकडे नेत जा 
कमीत कमी दिवाळीत तरी 
माझा वापर करीत जा 
सुटकेसचं बोलणं ऐकूण
माझं ही काळीज तुटलं 
म्हणलं बाई माणसाचं 
आता नशीब फुटलं 
म्हणून म्हणतो बाबांनो 
अहंकार सोडा 
बहीण भाऊ काका काकू 
पुन्हा नाती जोडा 
' संदुक ' आणि ' वळकटीचे '
स्मरण आपण करू 
दिवाळीला जाण्यासाठी 
पुन्हा सुटकेस भरू